प्रा.वसंत कानेटकर यांचा आज स्मृतिदिन !

  • 2017-01-31

प्रवीण कारखानीस " रायगडाला जेव्हा जाग येते " , " इथे ओशाळला मृत्यू " आणि " तुझा तू वाढवी राजा " यासारख्या जबरदस्त नाटकांचे लेखन करून छत्रपती शिवाजी आणि धर्मवीर संभाजी यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडून दाखविणारे प्रतिभावंत नाटककार प्रा.वसंत कानेटकर यांचा आज स्मृतिदिन ! ३१ जानेवारी २००१ रोजी ते निवर्तले . सांगली संस्थानातल्या रहिमतपूर गावी २० मार्च १९२२ रोजी जन्मले . " रविकिरण मंडळ " या तत्कालीन सुप्रसिद्ध " कवी-कट्ट्या " चे एक आधारस्तंभ असलेले कवी गिरीश हे त्यांचे पिताश्री . कानेटकर यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केल्यानंतर त्यांनी सांगली सोडली आणि नाशिकच्या " एच.पी.टी . "कॉलेज मध्ये दीर्घकाळ इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले .सर्वार्थाने ते नाशिकचे भूषण ठरले . शेक्सपियरच्या नाटकांचा त्यांचा अभ्यास किती गहन आणि किती आस्वादक वृत्तीचा होता , ते मला उमगले जेव्हा मी " शेक्सपियरची नाटके " या विषयावरचे त्यांचे अस्खलित इंग्रजीतले दोन-अडीच तासांचे प्रदीर्घ भाषण कलकत्याच्या " भारतीय भाषा परिषदे " त ऐकले होते . " इतिहास ही एक गहन काळोखी गुहा आहे .या गुहेच्या तोंडाशी आत जाणाऱ्याची पावले तेवढी दिसतात पण बाहेर सहीसलामत पडणारे त्याचे पाऊल मात्र दिसत नाही " असे त्यांनीच कुठेतरी लिहिले आहे ! असो. " वेड्याचं घर उन्हात " या त्यांच्या पहिल्याच नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर कमालीचे यश मिळविले . प्रेमा तुझा रंग कसा , देवाचं पाऊल , कस्तुरीमृग , मला काही सांगायचंय , सूर्याची पिल्ले , जिथे गवताला भाले फुटतात , अशी अनेक नाटके त्यांनी लिहिली असली तरी " लेकुरे उदंड झाली " या त्यांच्या आगळ्या वेगळ्या नाटकाने लोकप्रियतेचा उच्चांक केला . श्रीकांत मोघे आणि दया डोंगरे यांची जोडी या नाटकातले काव्यमय संवाद करताना अक्षरशः " हिट " ठरली तर वसंत कानेटकर यांच्या " अश्रूंची झाली फुले " या नाटकाने प्रभाकर पणशीकर आणि डॉ .काशिनाथ घाणेकर यांच्या अप्रतिम अभिनयकौशल्याचा आनंद नाट्यरसिकांना अनुभवायला मिळाला . या नाटकावर जेव्हा हिंदी चित्रपट निघाला तेव्हा त्यावर्षी कानेटकर याना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी " फिल्मफेअर अवॉर्ड " मिळाले . नाशिकच्या गोदातीरी वास्तव्य असलेल्या वि .वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचे जसे " नटसम्राट " तसे तिथेच वास्तव्य करीत असलेल्या वसंत कानेटकर यांचे " हिमालयाची सावली " हे एक जबरदस्त नाटक !.संगीत मत्स्यगंधा " या त्यांच्या नाटकातली , त्यांनीच रचलेली , जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली आणि रामदास कामत अथवा आशालता वाबगावकर यांनी गायलेली नाट्यगीते अजरामर ठरली . " अर्थशून्य वाटे मज हा कलह जीवनाचा ...धर्म ,न्याय , नीती सारा खेळ कल्पनेचा " किंवा " देवाघरचे ज्ञात कुणाला " अथवा " गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी ....हा प्रणय-गंध दरवळे तुझ्या अंगाशी " ही सगळी गाणी स्वतः कानेटकरानीच लिहिली होती याचे कारण कवी गिरीश या त्यांच्या पित्याचे त्यांच्यावर संस्कार होते ! बालकवी रचित " गर्द सभोती रान साजरी तू तर चाफेकळी ..काय हरवले ,सांग शोधिशी या यमुनेच्या जळी " या गीताचा उपयोग कानेटकरांनी या नाटकात आशालता वाबगावकर यांच्यासाठी केला होता . शेक्सपियरच्या तीन महान शोकान्त नाटकातले तीन नायक आणि त्यांचे तीन स्वभावविशेष डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी " गगनभेदी " हे एक असे नाटक लिहिले ज्याच्या नायकात त्यांनी ते तीनही स्वभावविशेष एकवटून दाखविले होते ! .....प्रा.वसंत कानेटकर यांनी १९८८ साली ठाणे येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते . भारत सरकारने त्याना १९९२ साली " पद्मश्री " पुरस्कार देऊन गौरविले होते ....त्यांच्या स्मृतीस अभिवादन ! -

Error message here!

Hide Error message here!

Forgot your password?

Lost your password? Please enter your email address. You will receive a link to create a new password.

Error message here!

Back to log-in

Close