मराठी साहित्याकांचे एक हक्काचे व्यासपीठ

-महाराष्ट्राच्या बाहेर निवास करणाऱ्या अनेक श्रेष्ठ मराठी भाषिक साहित्यकारांनी / कलावंतांनी मराठी / हिंदी भाषेला / कलेला खूप काही भरभरून दिलेलं आहे . मध्यप्रदेशातले राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचे मराठी भाषेतलं स्थान कोण विसरू केल ? असली अनेक नावं आपल्याला घेता येतील .आणि वर्तमानातले देखील बरीच नावं घेता येतील . महाराष्ट्राबरोबर आमची नाळ जुळलेली आहे म्हणून आपली ओळख महाराष्ट्रात टिकवून ठेवणे गरजेचं आहे . महत्वपूर्ण म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास १६ -१७ टक्के मराठी भाषिक महाराष्ट्राच्या बाहेर स्थायी निवास करत आहे. महाराष्ट्राच्याबाहेर राहणाऱ्या अनेक मराठी भाषिक मराठी / हिंदी साहित्यकारांना त्यांच्या व्यस्ततेमुळं व अनेक अडचणीमुळं महाराष्ट्रात इतक्या लांब मुंबई - पुणे येथे दरवेळेस जाणे शक्य होत नाही व या कारणामुळे त्यांच्या उर्जेला यथायोग्य वाव मिळत नाही .लिवा क्लबच्या स्थापनेचा उद्देश्यच बृहनमहाराष्ट्रातल्या विशेष करून मध्यप्रदेशातल्या मराठी भाषिक साहित्यिकांना त्यांच्या प्रकाशनासाठी येणाऱ्या अडथळयांना दूर करणं आहे.

मराठी भाषिक साहित्यकारांच्या...

मराठी भाषिक साहित्यकारांच्या हिंदी / मराठी साहित्याला साहित्य वर्तुळात स्थापित आणि प्रतिष्ठित करण्यासाठी आणि त्या साहित्यकारांना साहित्य क्षेत्रात महाराष्ट्राबरोबरच इतर सर्व ठिकाणी मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी , एकूण मराठी भाषिक साहित्यकारांना त्यांच्या हक्काचे एक व्यासपीठ मिळावे म्हणून इंदूरला , " लिवा क्लब ,इंदूर " ( लिहावे वाचावे क्लब ) ची स्थापना करण्यात आली

लिवा क्लबची स्थापना...

लिवा क्लबची स्थापना दिनांक २ ऑगस्ट २०१५ ला झाली . उद्घाटनप्रसंगी दिवसभराच्या स्नेह्भेट या मेळाव्यात मुंबई , इंदूर , भोपाळ , ग्वाल्हेर , खांडवा , बऱ्हाणपूर , उज्जैन , आणि देवाससकट ५०पेक्षा जास्त साहित्यिक या मेळाव्यात सहभागी झाले होते . दैनिक लोकसत्ता , मुंबईचे प्रधान संपादक श्री गिरीष कुबेर हे प्रमुख पाहुणे होते . लिवा क्लबने आपल्या सदस्यांना लिहिते करण्यासाठी , त्यांचे साहित्य महाराष्ट्रात नियत कालिकांमध्ये नियमितपणे प्रसिध्द होईल याच्यासाठी काही करता येते कां यासाठी आणि मध्यप्रदेशातल्या साहित्यकांचे पुस्तकं महाराष्ट्रात वाचकांसमोर कसे पोहचविता येईल , त्यांचा कसा प्रचार प्रसार करता येईल , आणि महत्वाचे म्हणजे त्यांची विक्री आणि वितरण कसे करता येईल या बाबद झालेल्या चर्चासत्रात अनेकांनी आपले मत मांडल्यामुळे सर्वच विषयांवर गंभीर अशी सार्थक चर्चा झाली होती . या चर्चेमुळे नक्कीच लिवा क्लबसकट सगळ्यांनाच मार्गदर्शन मिळाले असेल असे वाटते . आणि म्हणूनच अनेक लोकं लिवाक्लबसोबत जुळत गेले .

लिवा क्लबच्या पहिला कार्यक्रम...

लिवा क्लबच्या पहिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकसत्ता मुंबईचे प्रधान संपादक श्री गिरीश कुबेर या कार्यक्रमात म्हणाले , की तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळं साहित्य क्षेत्रात बराच बदल झालेला आहे . काळावेळाप्रमाणे साहित्यातले हे बदल साहित्याकारांना देखील लक्षात ठेवायला हवे आणि त्या प्रमाणे आपल्या साहित्याची निर्मिती करावयाला हवी . आज मराठी भाषेत कथा कविता या कालबाह्य झालेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात काही तरी नवीन माहिती पुरवत असणाऱ्या साहित्याची आज जास्त गरज आहे आणि त्याचीच आज जास्त मागणी देखील आहे . म्हणून साहित्यकारांनी त्या बद्दल विचार करावा आणि साहित्यात प्रासंगिकता लक्षात ठेवावी . त्यांनी,' लिवा क्लब 'प्रारंभ झाल्याचे जाहीर केले .

या नंतर तीन पुस्तकांचे विमोचन आणि श्री सर्वोत्तम या त्रैमासिकातर्फे आयोजित ' कै. बाळ काका उर्ध्वरेषे कथा स्पर्धा ' २०१४ आणि २०१५ साठी पुरस्कार वाटण्यात आले. सर्व प्रथम राधिका इंगळे यांच्या , " त्रिवेणी " या मराठी काव्यसंग्रहाचे विमोचन झाले . या नंतर डॉ. शकुंतला सिन्हा यांच्या , " दर्द का रिश्ता " या हिंदी कथासंग्रहाचे विजया भुसारी यांनी मराठी भाषेत , " जडले नाते दु:खाचे " या नावाने केलेल्या कथा संग्रहाचे आणि नंतर , ज्येष्ठ साहित्यिक श्री विश्वनाथ शिरढोणकर यांचे आणि मराठीचे प्रसिद्ध साहित्यिक श्री राजन खान यांचे प्रकाशन , अक्षर मानव प्रकाशन, पुणे, तर्फे प्रकाशित, " विहान " या मराठी काव्य संग्रहाचे विमोचन प्रमुख पाहुणे गिरीश कुबेर आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष अनुराधाताई जामदार यांच्या हस्ते झाले.

या नंतर ' कै. बाळ काका उर्ध्वरेषे कथा स्पर्धा ' २०१४ च्या पुरस्कार वाटपात, क्रमश: डॉ. अस्मिता हवलदार यांना प्रथम, मेघा खिरे यांना द्वितीय आणि श्री मदन बोबडे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला . तसेच २०१५ च्या कथास्पर्धांसाठी क्रमश: संदीप सरवटे यांना प्रथम, रोहिणी जोशी यांना द्वितीय आणि माणिक भिसे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गिरीश कुबेर यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना प्रत्येकी प्रमाणपत्र आणि रोख रकम देण्यात आली .

लिवा क्लबचा दुसरा कार्यक्रम...

लिवा क्लबचा दुसरा कार्यक्रम दिनांक १० ऑक्टोबर रोजी झाला . या अगोदर नुकतीच , लिवा क्लबचे स्वप्न बघणारे इंदूरचे एकमेव मराठी साहित्याचे आघाडीचे प्रकाशक , श्री सर्वोत्तम त्रैमासिकाचे प्रकाशक आणि मराठी भाषेचे कैवारी श्री अश्विन खरे यांची नेमणूक मध्यप्रदेश शासनाच्या संस्कृती परिषदेच्या निदेशक या पदावर झाली होती . लिवा क्लबच्या याच कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांसोबत इंदूरकरांनी श्री अश्विन खरे यांचे भव्य स्वागत केले . लिवा क्लबच्या या दुसऱ्या कार्क्रमात एकूण ४० पेक्षा जास्त साहित्यिकांचा सहभाग होता . या दिवशी लिवा क्लबच्या सहाय्याने प्रकाशित श्री श्याम खरे यांचे,' श्रीमद्भागवतगीता ओवी स्वरुपात(मराठीत)या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन झाले .

याच दिवशी मध्यप्रदेशच्या लेखकांसाठी गौरवान्वित करणारे अशा आणखीन एका पुस्तकाचे विमोचन झाले . डॉ . श्रीपाल सबनीस हे गेल्या चार वर्षांपासून बृहनम्हराष्ट्रातल्या मराठी साहित्यकारांच्या पुस्तकांचा आणि त्यांच्या एकूण साहित्यिक वाटचालीचा आराखडा घेत, सातत्याने समीक्षात्मक लेख लिहित होते . आणि हे लेख पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या कुमार सप्तऋषी यांच्या पुणे येथून प्रकाशित , ' सत्याग्रही ' या मासिकात प्रत्येक महिन्यात प्रसिध्द देखील झालेले होते .या सर्वांची दखल घेत पुणेच्या राजीव बर्वे यांच्या,' दिलीपराज प्रकाशन ' ने एकूण ३४ लेखांचा समावेश करत , ' बृहनमहाराष्ट्राचे वांग्मायीन संचित ' या नावाने पुस्तक प्रकाशित केले .यात मध्यप्रदेशातल्या १३ लेखकांचा समावेश आहे.

लिवा क्लबचा तिसरा कार्यक्रम...

या नंतर लिवा क्लब, इंदूरच्या तिसऱ्या कार्यक्रमात दिनांक २२ आणि २३ नोव्हेंबर २०१५ ला लिवा क्लब , इंदूरने मुक्त संवाद इंदूर ,आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळीवेगळी अशी दोन दिवसीय, " लेखक प्रकाशक कार्यशाळा " आयोजित केली . दोन दिवसाच्या एकूण सात सत्रात , प्रकाशनाचे , विक्रीचे आणि वितरणाचे बारकावे सकट , कवितेचे बदलते स्वरूप व रंगमंचावरील प्रस्तुतीसाठी नाट्य लेखनातले बारकावे अशा गंभीर विषयांवर आमंत्रित विद्वान मान्यवरांचे मार्गदर्शन सर्वाना लाभले.

या दोन दिवसाच्या कार्क्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून "अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ " चे अध्यक्ष श्री राजीव बर्वे , याच बरोबर अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या कार्यकारणीतले विद्वान सदस्य श्री शरद गोगटे , श्री अविनाश पंडित , डॉ. स्नेहसुधा कुळकर्णी , श्री सुकुमार बेरी , श्री पराग लोणकर हे वक्ते होते . भोपाळच्या अनुराधाताई जामदार यांनी कवितेचे बदलते स्वरूप , आणि प्रसिध्द रंगकर्मी इंदूरचे श्री राजन देशमुख यांनी , ' रंगमंचावरील प्रस्तुतीसाठी नाट्य लेखनातले बारकावे' अशा गंभीर विषयांवर आपले विचार मांडले.

अनेकांना अजूनही अनेक प्रश्न पडतात . लिवा ( लिहावे वाचावे ) क्लब म्हणजे काय ? याचे उद्देश्य काय ? यातून निष्पन्न काय होणार ? लिवा क्लबच्या सदस्यांना काय मिळणार ? मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लिवा क्लब काय करणार ?मराठी लेखकांना लिवा क्लब कशी काय मदद करणार ? पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिवा क्लबबरोबर जुळल्यावरच मिळू शकतील असं आमचं मत आहे . आणि लोकं जुळत देखील आहे . इतक्याशा अल्प अवधीत लिवा क्लबने एक वातावरण निर्मित केले आहे . तीन कार्यक्रम करून एक जागरुकता निर्माण केलेली आहे . ५ पुस्तकांचे विमोचन केलेले आहेत याच बरोबर लिवा क्लबच्या सहाय्याने एक पुस्तक प्रकाशित झालेले आहेत . एक लेखन प्रकाशन कार्यशाळा झालेली आहे . श्री गिरीश कुबेर आणि डॉ. श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान झालेले आहेत . ग्वाल्हेरच्या मराठीच्या आघाडीच्या साहित्यिक डॉ . उमा कम्पूवाले याचे साहित्य पुणेच्या , चपराक मासिकात आणि रत्नागिरीच्या ' रत्नागिरीटाईम्स ' या दैनिकाच्या 8 आवृत्तीत प्रसिद्ध करविण्यासाठी लिवा क्लबने पुढाकार घेतला. ही फक्त लिवा क्लबची सहा महिन्याची कामगिरी आहेत.

आम्ही फेसबुक वर लिवाक्लब , इंदूर या नावाने एक समूह स्थापित केलेला आहे . यात ११०० पेक्षा जास्त सदस्य झालेले आहेत. इंदूर ,भोपाळ , ग्वाल्हेरसंकट मध्यप्रदेशच्या अनेक घडामोडीची माहिती हा समूह महाराष्ट्रात देतो आणि महाराष्ट्रातल्या महत्वपूर्ण घडामोडी हा समूह आपल्या सदस्यांना कळविण्याचे प्रयत्न करतो . अनेक साहित्यिकांनी अद्याप कम्प्युटरशी मैत्री केलेली नाही , अनेक साहित्यिक फेसबुकसारख्या सोशल मिडियापासून दूर आहेत. पण प्रिंट मिडिया म्हणजे , वर्तमान पत्र , मासिक ,किंवा दिवाळी अंकात जागे अभावी अनेक श्रेष्ठ साहित्याला सामाहून घेता येत नाही .पण सोशलमिडिया वर आपण आपले साहित्य सहज पोस्ट करू शकतो . आणि आपल्याला वाचकांच्या मनात घर देखील करता येते . म्हणून सदस्यांनी फेसबुकच्या लिवाक्लब या समूहावर सक्रिय राहावे.

या समूहाच्या अनेक कल्पना आहेत आणि येणाऱ्या दिवसात त्या साकार करण्याचे आमचे मनोगत देखील आहेत . सदस्यांनी आपले साहित्य , मग ते लेख असो , कविता असो , कथा असो , या समूहावर पोस्ट कराव्या असा आमचा आग्रह आहे . आपली सामाजिक बांधिलकी बाळगून , वर्तमान घडामोडींवर आपले परखड मत देखील सदस्यांनी मांडावे . फक्त असली सामग्री आक्षेपार्ह नसावी.

आजच्या परिस्थितीत प्रत्येक साहित्यकार आपापल्यापरीने एकटाच परिस्थितीशी झुंज देत आहे . जीवघेण्या प्रतीस्पर्धेच्या काळात योग्य वाव न मिळाल्याने नवोदितांच्या साहित्याला प्रसिद्धीसाठी एक कठीण प्रवासाला सामोरे जावे लागत आहे . म्हणून , आमच्या सदस्यांसाठी आम्ही येणाऱ्या दिवसात , कथा संग्रह , काव्य संग्रह आणि ललित लेख संग्रह प्रकाशित करण्याची योजना बनवीत आहो . त्या साठी सदस्यांना सल्ला आहे की त्यांनी आपले जास्तीत जास्त साहित्य या समूहावर पोस्ट करावी म्हणजे त्यातले श्रेष्ठ आणि निवडक साहित्य असल्या संग्रहासाठी वापरता येईल.

Error message here!

Hide Error message here!

Forgot your password?

Lost your password? Please enter your email address. You will receive a link to create a new password.

Error message here!

Back to log-in

Close